अकोला : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक महामार्गावर अनेक अपघाताच्या अनेक घटना घडत असतांना एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. लग्नात आलेल्या चारचाकीचा भीषण अपघात झाला असून या अपघातात एक ठार तर चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. हा अपघात अकोला जिल्ह्यात झाला आहे. पाेलिस या घटनेचा कसून तपास करीत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील माना येथील राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री ट्रक आणि चारचाकीचा भीषण अपघात झाला. चारचाकी वाहनात प्रवास करणारी लोक मित्राच्या लग्नाला गुजरातहून वरुडकडे निघाले असताना ही दुर्दैवी घटना घडली. या अपघातात वाहन चालक धीरज वैराळे (राहणार मलकापूर जिल्हा बुलढाणा) याचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना मुर्तीजापुर येथील सामान्य उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
विनोद गडारी, मंगल पवार, शिवप्रताप तिवारी (रा.धुळे) आणि सागर विश्वेश्वर उमाळे (रा. तिगाव मारू, पांधूर्णा, मध्यप्रदेश) असं कारमधील जखमींची नावे आहेत. जखमी आणि मृतक तरुण हे सर्व मित्र असून एका कंपनीत कामाला होते. कंपनीत असलेल्या मित्राच्या लग्नाला जात असताना ही अपघाताची घटना घडली आहे. अपघाताची माहिती समजताच आज पहाटेच मृतक आणि जखमींच्या नातेवाईकांनी रुग्णालय गाठले.