छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
अहमदनगर – छत्रपती संभाजी नगर महामार्गावर एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरने दोन दुचाकींना पाठीमागून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की दुचाकीवरील एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांचा समावेश आहे. ही घटना पांढरी पूल परिसरात रविवारी २८ जानेवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह अनिल बाळासाहेब पवार (वय २८), सोनाली अनिल पवार (वय २२), माऊली अनिल पवार (वय ११) अशी मृतांची नावे आहेत. तर दुसऱ्या दुचाकीवरील भगवान आव्हाड हे जखमी झाले आहेत. अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. नागरिकांचा रोष पाहताच कंटेनर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. मृत पवार कुटुंबीय वडगाव सावताळ (ता. पारनेर, जि. अहमदनगर) येथील रहिवासी होते. रविवारी कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर एकाच स्कूटीवरून ते घरी परतत होते.
दरम्यान, सायंकाळच्या सुमारास पांढरी पूल परिसरात पवार कुटुंब आले असता, पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरने त्यांच्या स्कूटीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये पवार कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर-संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात होत आहेत. शुक्रवार (२६ जानेवारी) देखील महामार्गावर झालेल्या अपघातात सहाजण जखमी झाल्याची घटना घडली होती.