पुणे : वृत्तसंस्था
राजकीय पार्श्वभूमी असलेल्या ३५ वर्षीय व्यक्तीने अभिनेत्री तरुणीवर बलात्कार करून तिच्या डोक्याला पिस्टल लावून धमकावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विमानतळ पोलिस ठाण्यात विराज रविकांत पाटील (३५, रा. रॉयल पाल्म, सोरेगाव, सोलापूर) याच्यावर बलात्कारासह आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडितेने (३२) शुक्रवारी फिर्याद दिली आहे. हा प्रकार २७ ऑगस्ट २०२३ ते २० जानेवारी २०२४ या कालावधीत विमाननगर व मुळशी येथील रिसॉर्टमध्ये घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विराज पाटील हा राजकीय पार्श्वभूमी असलेली व्यक्ती आहे. तर पीडिता अभिनेत्री आहे. आरोपी आणि फिर्यादी यांची ओळख सोशल मीडियावर झाली. आरोपी विराज पाटील याने पत्नीसोबत घटस्फोट घेऊन तुझ्यासोबत लग्न करणार असल्याचे सांगत तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. पीडितेने विचारणा केली असता विराज पाटील याने शिवीगाळ केली. त्याच्याकडे असलेले पिस्टल तरुणीच्या डोक्याला लावून मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही. तू पोलिसांकडे गेली तर तुला दाखवतो मी कोण आहे ते, अशी धमकी देऊन धक्काबुक्की केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.