नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आपण कुठल्याही हॉटेलमध्ये कुटुंबासह, मित्रासोबत जेवण्यासाठी जातो, तेव्हा जेवण झाल्यानंतर प्रथम वेटरकडे बिल मागतो. समजा तुमचे बिल २३६० रुपये झाले, तर तुम्ही वेटरला २५०० रुपये देता आणि तो कांऊटरवरून १४० रुपये परत आणून देतो. त्यानंतर वेटरला ती शिल्लक राहिलेली रक्कम टीप म्हणून देतात. तुम्हाला वेटरची सर्व्हिस चांगली वाटली याची ती पोच पावती असते आणि तुमच्याकडून ती वेटरला टीप म्हणून दिली जाते.
टीप देण्याची एक मर्यादा असते, मात्र कोणी जर २० लाख रुपये टीप म्हणून दिले तर… ऐकायला विचित्र किंवा अविश्वसनीय वाटत असले तरी ही सत्य घटना आहे. दुबईच्या साल्ट बे हॉटेलमध्ये हा किस्सा घडला आहे. तेथे जेवण्यासाठी गेलेल्या काही जणांनी टीप म्हणून २० लाखांपेक्षा अधिक पैसे वेटरला दिले आहेत. स्वतः हॉटेलने हे बिल सोशल मीडियावर शेअर केले आहे. हे पाहून नेटकरी चकित झाले आहेत आणि विचारत आहेत की, एवढ्या पैशाचे तुम्ही काय करणार?
हे बिल हॉटेलमधील शेफने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले असून पैसा असाच येतो आणि असाच जातो. संपूर्ण बिल ९० लाख रुपयांचे आहे, हो… हे आणखी सत्य आहे. यात त्या लोकांनी ३,७५,००० रुपयांचे जेवण केले, ड्रिंक्सवर ६५ लाख खर्च केला. याव्यतिरिक्त वेटरची सेवा खूपच आवडली म्हणून त्याला २० लाखांपेक्षा अधिक रुपये टीप म्हणून दिले, असे शेफने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
इंटरनेटच्या जगात ही पोस्ट व्हायरल झाली. तिला २.१९ लाखांपेक्षा अधिक लाईक्स मिळाले असून हजारो जणांनी कमेंट केल्या आहेत. ही टीपची रक्कम पाहून अनेक जण आश्चर्यचकीत झाले आहेत. एकाने लिहिले की, एवढ्या मोठ्या बिलावर, एवढी टीप कोण देते.. भाऊ, तर दुसऱ्याने कमेंट केली की, ‘कौन है यह लोग….कहाँसे आते है… यह लोग…’