पाटणा : वृत्तसंस्था
देशात आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच बिहार राज्यात राजकीय भूकंप झाला असून नितीश कुमार यांनी 9व्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. तत्पूर्वी, नितीश कुमार यांनी सकाळी 11 वाजता राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला. नितीश यांनी भाजपच्या पाठिंब्याचे पत्र देऊन सरकार स्थापनेची चर्चा केली. तत्पूर्वी, नितीश यांच्या पक्षाच्या खासदार आणि आमदारांची सीएम हाऊसमध्ये बैठक झाली. येथे नितीश यांनी राजीनाम्याची घोषणा केली.
मिळालेल्या माहितीनुसार, त्याचबरोबर भाजपने सम्राट चौधरी यांना विधिमंडळ पक्षनेते आणि विजय सिन्हा यांची उपनेतेपदी निवड केली आहे. या दोघांना उपमुख्यमंत्री केले जात आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा दुपारी पाटणा येथे पोहोचत आहेत.
राजीनामा दिल्यानंतर नितीश मीडियाला म्हणाले- आम्ही राज्यपालांना विद्यमान सरकार संपवण्यास सांगितले. सर्व बाजूंनी मते येत होती. हे आम्ही ऐकले आहे. आता पूर्वीची युती सोडून नवी युती झाली आहे. आज आम्ही त्यांच्यापासून वेगळे झालो. आम्ही काम करत होतो, ते अजिबात काम करत नव्हते. लोकांना त्रास होत होता, आम्ही बोलणे बंद केले होते.