नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह सुरु असतांना दि.२७ रोजी दिल्ली येथे देवीचं जागरण सुरू असताना अचानक मंदिरातील स्टेज कोसळला. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून १७ भाविक जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. थरकाप उडवणारी ही घटना दिल्लीतील कालकाजी माता मंदिरात मध्यरात्रीच्या सुमारास घडली. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. मृत महिलेचं वय ४५ वर्ष असल्याचं सांगितलं जातंय. या घटनेमुळे परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील कालकाजी मंदिरात शनिवारी (२७ जानेवारी) रात्रीच्या सुमारास देवीच्या जागरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला शेकडो भाविकांनी गर्दी केली होती. दरम्यान, कार्यक्रम सुरू असताना अचानक मंदिरातील लाकडी स्टेज कोसळला. स्टेज कोसळत असल्याचं लक्षात येताच भाविकांनी मंदिरातून बाहेर पडण्यास सुरूवात केली. मात्र, या घटनेत अनेक भाविक जखमी झाले.
जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, एका ४५ वर्षीय महिलेला डॉक्टरांन तपासून मृत घोषित केलं. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आयोजकांवर गुन्हा दाखल केला. देवीच्या जागरणासाठी गेलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.