जळगाव : प्रतिनिधी
दुकानामध्ये झोपलेल्या कारागिरांना धमकावत दागिने घडवण्यासह सोने पॉलिशचे काम होणाऱ्या दुकानांमधून १४ लाख ५९ हजार ५२४ रुपये किमतीचे एकूण २५१.७८० ग्रॅम वजनाचे सोने चोरट्यांनी चोरून नेले, ही धाडसी चोरी २६ जानेवारी रोजी पहाटे मारुती पेठमध्ये उघडकीस आली. या प्रकरणी शनिपेठ पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मारुती पेठ भागात एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सचिन प्रभाकर सोनार (३८, रा. रामपेठ) यांचे दागिने बनवण्याचे श्री अलंकार नावाचे दुकान असून, दुसऱ्या मजल्यावर शेख जोसीमोद्दीन बशीरोद्दीन यांचे नूर पॉलिश छिलाई सेंटर नावाचे सोने पॉलिशचे दुकान आहे.
२२ जानेवारी रोजी, एका नामांकित सुवर्ण पेढीकडून सचिन सोनार यांच्याकडे १७३.७९९ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड दागिने घडविण्यासाठी दिली होती. त्यातून काही दागिने तयार करून दिले तर काही तयार करणे बाकी होते. त्यानंतर २५ जानेवारी रोजी सोनार हे नातेवाइकांसह चोपडा तालुक्यातील चहार्डी येथे गेले होते. त्यावेळी दुकानात त्यांचे मावस भाऊ व कारागीर होते. ते रात्री दुकान बंद करून गेले. पहाटे साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास चार जणांनी सोनार यांच्या दुकानाचे लोखंडी गेट व चॅनल गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला, त्यावेळी दुकानात ठेवलेले आठ लाख ६९ हजार ३७४ रुपये किमतीचे १५०.०३० वजनाचे सोन्याचे कच्चे मटेरिअल चोरून नेले. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी या ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले.