मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या अनेक महिन्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील आपला लढा देत होते. आज अखेर त्यांच्या सर्वच मागण्या सरकारने मान्य केल्या आहे. सरकारने मध्यरात्रीच याबाबतचे अध्यादेश देखील काढले आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. राज्य सरकारने जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य करताच नवी मुंबईत मराठा आंदोलकांनी मध्यरात्रीच जल्लोष सुरू केला होता. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं, तसेच आंदोलकांवरील गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावेत, यासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या ५ महिन्यांपासून आंदोलन करीत होते.
त्यांच्या आंदोलनाची सुरुवात जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून झाली. मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी राज्य सरकारने जरांगे यांच्याकडे वेळही मागितला होता. दोनदा वेळ वाढून दिल्यानंतरही सरकारने आरक्षणाबाबत काहीच पाऊल उचलले नाही, असा आरोप करत मनोज जरांगे पाटील यांनी थेट मुंबईत धडकण्याची घोषणा केली होती.
त्यानुसार, २० जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथून मराठ्यांची पदयात्रा मुंबईच्या दिशेने निघाली. या यात्रेत राज्यातील अनेक मराठा तरुण तसेच महिला सहभागी झाल्या. गुरुवारी (२५ जानेवारी) मराठा आंदोलकांचं वादळ मुंबईच्या वेशीवर येऊन धडकलं. शुक्रवारी सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केल्यानंतर जरांगे यांनी सरकारचा जीआर मराठा बांधवांना सांगितला. आमच्या बऱ्याच मागण्या सरकारने मान्य केल्या. मात्र, सग्यासोयऱ्यांची मागणी मान्य केली नाही, तसेच मराठा आंदोलकांवरील गुन्हे माघे घेतले नाही, ते तातडीने मागे घ्यावे, त्यानंतर मी शनिवारी २७ जानेवारी मराठा समाजाची भूमिका जाहीर करणार, असं जरांगे यांनी सरकारला सांगितलं होतं.
इतकंच नाही, तर काही दगाफटका करण्याचा प्रयत्न केला, तर राज्यातील संपूर्ण मराठा समाज मुंबईत येऊन धडकणार असा, इशाराही जरांगे यांनी सरकारला दिला होता. जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिष्टमंडळासोबत चर्चा केली. त्यानंतर मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्याचं सूत्रांनी सांगितलं. राज्य सरकारचं शिष्टमंडळ मध्यरात्रीच जीआर तसेच अध्यादेश घेऊन जरांगे यांच्या भेटीसाठी नवी मुंबईत दाखल झालं होतं. सरकारने आपल्या सर्व मागण्या मान्य केल्या, असं या शिष्टमंडळाने जरांगे यांना सांगितलं. मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला दरम्यान शनिवारी सकाळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी मुंबईतील वाशी येथे दाखल होणार असून मनोज जरांगे त्यांच्या उपस्थितीत उपोषण सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जरांगे यांची विजयी सभा देखील होणार आहे.