मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी वातावरण तापविले आहे. मराठा समाजाचा मोर्चा मुंबईत दाखल होताच या मोर्चाची सरकारने दखल घेतली असून आता सरकार मधील मंत्री दीपक केसरकर यांनी मनोज जरांगे यांच्या सर्वच मागण्या मान्य करण्यात आल्याची घोषणा केली आहे. सरकारच्या शिष्टमंडळाची आज मनोज जरांगे यांच्याशी चर्चा झाली. ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाली. त्यात त्यांच्या सर्वच मागण्या मान्य करण्यात आल्या. आता त्याची विहित नियमांत अंमलबजावणी होईल, असे केसरकर यांनी सांगितले आहे.
मंत्री दीपक केसरकर माध्यमांशी बोलताना म्हणाले की,मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. मनोज जरांगे पाटील हे संवेदनशील आहेत. ते महाराष्ट्राच्या हिताचा विचार करतील. आता मागण्या तर मान्य झाल्या. पण, त्याची अमंलबजावणी ही शासकीय विहीत नियम असतात त्याप्रमाणे होत असते. पंरतु महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं आहे की, आत्तापर्यंत आपण 37 लाख कुणबी प्रमाणपत्र देऊ शकलो. आता ही नवी प्रकिया पुर्ण केल्यानंतर ही संख्या 50 लाखांच्या वरती जाणार आहे. त्यामुळे हा न्याय मिळवण्यामध्ये मनोज जरांगेंची भूमिका आहे. त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो.
मुंबई ठप्पं होणे देशाच्या दृष्टीने योग्य नाही. मुख्यमंत्री यांनी स्वतः पुढाकार घेऊन यंत्रणा कामाला लावली. शेवटी प्रथा – परंपरेचा मान ठेवणे ही सुद्धा राज्याचे संस्कृती राहिली आहे. किती अधिकारी भेटायला गेले, किती नेते भेटायला गेले याला अर्थ नाही. राज्य शासन हे राज्य शासन असते. सर्व यंत्रणा कामाला लागल्या याचा सुद्धा त्यांनी मान ठेवला पाहिजे, त्यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री त्यांना भेटून आनंद नक्कीच साजरा करतील, असे केसरकर म्हणाले.