मुंबई : वृत्तसंस्था
मनोज जरांगे पाटील हजारो मराठा आंदोलकांसह तब्बल ६ दिवसांच्या पायी यात्रेनंतर आज अखेर मुंबईच्या वेशीवर येऊन धडकले आहेत. जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या संख्येने मराठा बांधव जमले आहेत. सकाळी ९ वाजेच्या सुमारास जरांगे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेनंतर असून सकाळी ११ वाजेनंतर ते आझाद मैदानाच्या दिशेने कूच करणार आहे.
दरम्यान, मनोज जरांगे यांनी एपीएमसी मार्केटमध्ये झेंडावंदन केले. यानंतर त्यांनी पत्रकारपरिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा अद्याप झालेली नाही. थोड्या वेळात चर्चा होईल. बैठकीत तोडगा निघाला नाही तर आझाद मैदानावर जाणार आहे, असे मनोज जरांगे यांनी सांगितलं.
मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी पोलिसांनी नाकारली आहे. तसेच शिवाजी पार्कची परवानगी नाकारली आहे. आझाद मैदानाची क्षमता लक्षात घेऊन त्यांना परवानगी दिली नाही. परंतु मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी ठाम आहे.
पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानाऐवजी खालघरच्या सेंट्रल पार्कचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, जरांगे यांनी हा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. आम्ही आझाद मैदानावरच उपोषण करणार, असं जरांगे यांनी सांगितलं आहे. दरम्यान, आझाद मैदानाकडे कूच करण्याआधी सरकारचं शिष्टमंडळ जरांगे यांची भेट घेणार आहे. राज्य सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे सरसकट कुणबी प्रमाणपत्राचा निर्णय जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, असं जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.