नवी दिल्ली : वृत्तसंस्था
उत्तरप्रदेशमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. उत्तरप्रदेशच्या शाहजहांपूरमध्ये ट्रक आणि टेम्पोमध्ये गुरूवारी पहाटे भयानक अपघात झाला. या अपघातात १२ भाविकांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. रस्त्यावर पडलेले मृतदेह, नातेवाईकांच्या किंचाळ्यांनी अवघा परिसर सुन्न झाल्याचे पाहायला मिळाले.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेशच्या शाहजहांपूरमध्ये गुरूवारी पहाटे ट्रक आणि टेंम्पोमध्ये मोठा अपघात झाला. शाहंजहापूर भागातील दमगडा गावचे काही लोक गंगेत स्नान करण्यासाठी ऑटोने फरुखाबाद येथील पांचाळ घाटाकडे रिक्षामधून जात होते.
यावेळी बरेली-फर्रुखाबाद महामार्गावर आल्हागंज येथील सुगुसुगी गावाजवळ समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या ऑटोला धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की ऑटोचा चक्काचूर झाला. त्यात प्रवास करणाऱ्या 12 भाविकांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये आठ पुरुष, तीन महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, ट्रकच्या धडकेनंतर ऑटोमधील पाच-सहा लोक रस्त्यावर पडले होते. त्यांचा जीव वाचू शकला असता, मात्र अपघातानंतर ट्रक त्यांच्या अंगावरून गेला, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलीसांसह स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर ट्रक चालक पळून गेल्याचेही सांगण्यात येत आहे.
दरम्यान, दाट धुक्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात इतका भयानक होता की रिक्षाचे अक्षरशः दोन तुकडे झाले. अपघातस्थळी विखुरलेले मृतदेह, त्यांच्या नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा काळीज पिळवटुन टाकणारा होता.