मुंबई : वृत्तसंस्था
मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या २० तारखेपासून मुंबईकडे धाव घेत असतांना आता याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसांकडून मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावण्यात आली आहे. आझाद मैदान, शिवाजी पार्कसाठी परवानगी नसल्याचा उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आला आहे. यावर आता मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाची मागणी करत लाखो बांधवांसह मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. जरांगे पाटील यांच्या मोर्चाला प्रचंड मोठा प्रतिसाद पाहायला मिळत असून सध्या ते लोणावळ्यात आहेत. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच मुंबई पोलिसांकडून मनोज जरांगेंना नोटीस पाठवण्यात आली आहे.
मराठा आंदोलनाचा विपरित परिणाम होऊन मुंबईचे जनजीवन विस्कळीत होऊ शकते. त्याचबरोबर मराठा आंदोलनामध्ये सहभागी लोकांची संख्या पाहता तेवढ्या क्षमतेचे कोणतेही मैदान नाही. त्यामुळे जरांगे यांना आंदोलन करण्यासाठी खारघरमधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान ठीक राहील, अशा सूचना या नोटीसीमधून देण्यात आल्या आहेत.
आझाद मैदानामध्ये न्यायालयाच्या निर्देशानुसार ५०००ते ६००० इतक्याच लोकांना आंदोलन करण्याची क्षमता आहे. परंतु त्यापेक्षा जास्त लोक आल्यास तेथे सोई- सुविधा नाहीत. तसेच शिवाजी पार्क मैदानावर २६ जानेवारीचा कार्यक्रम असल्याने तेथे कार्यक्रम घेता येणार नाही, असे या नोटीसीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ऍडव्होकेट सतीश मानेशिंदे या नोटिशीला उत्तर देणार आहेत.