जळगाव : प्रतिनिधी
शहरातील जुने जळगाव भागातील कोल्हे वाड्यात एका परिचारिकेच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागून संपूर्ण संसारोपयोगी वस्तू आणि काही रक्कम जळून खाक झाल्याची ही घटना बुधवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास घडली. सकाळच्या वेळी घरामध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील जुने जळगाव भागातील कोल्हे वाड्यातील शीतल मराठे यांच्या घराला आग लागल्याचे कळताच, माजी नगरसेवक कमलाकर बनसोडे यांनी गल्लीतील लोकांसोबत आग विझविण्यासाठी धाव घेतली. गल्ली अरुंद असल्याने अग्निशमन विभागाचे वाहन या भागात येऊ शकत नसल्याने, स्थानिक नागरिकांनी बादलीने पाणी टाकत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत घरातील बरेच साहित्य आगीत जळून खाक झाले होते. यावेळी अग्निशमन दलाचे फायरमन श्री भारत बारी, तेजस जोशी, पन्नालाल सोनवणे, विजय पाटील व वाहन चालक युसूफ पटेल यांनी जावून आग विझविली.