वर्धा : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शासकीय कार्यालयात लाचखोरीचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढ झाली असून नुकतेच वर्धामध्ये देखील लाच घेताना एका महिलेला रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. मंजूर विहिरीच्या उर्वरित रकमेचा धनादेश देण्यासाठी दोन हजारांची लाच स्वीकारताना बोदड येथे ग्रामसेवक महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात अटक केलीये.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्चना (वय ४३) असं आरोपी ग्रामसेवीका महिलेचं नाव आहे. देवळी तालुक्यातील बोदड येथील एका शेतकऱ्यास मनरेगाअंतर्गत सिंचन विहीर मंजूर झालीये. विहिरीकरिता मंजूर उर्वरित रकमेचा धनादेश देण्यासाठी ग्रामसेविका अर्चना किसनराव बागडे यांनी तक्रारदार शेतकऱ्यास दोन हजार रुपयांची मागणी केली.
त्या शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. ठरल्याप्रमाणे मंगळवारी दोन हजारांची लाच दिली. लाच स्वीकारताना महिलेला रंगेहात अटक करण्यात आलीये. याप्रकरणी पुलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
कारवाई नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन कदम, संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक अभय अष्टेकर, पोलिस निरीक्षक सुहासिनी सहस्रबुद्धे, संतोष बावनकुळे, स्मिता भगत, कैलास वालदे, राखी फुलमाळी, पंकज डहाके, प्रशांत मानमोडे, प्रदीप कुचनकर, नीलेश महाजन आदींनी केली. पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.