चाळीसगाव : प्रतिनिधी
शहरातील डेअरी भागातील मॉडर्न डेअरीच्या मागे सार्वजनिक जागेत सुरू असलेल्या जुगार अड्यावर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. त्यात पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात १ लाख ७२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई २२ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास करण्यात आली.
पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले. पोहेकों नितीन वाल्हे, भूषण पाटील, महेंद्र पाटील, पोकाँ भरत गोराळकर, राकेश महाजन, विजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. मॉडर्न डेअरीच्या पाठीमागे काही लोक घोळका करून पैसे फेकून पत्ता जुगाराचा खेळ खेळताना दिसल्याने त्यांच्यावर अचानक छापा टाकून त्यांना पंचांसमक्ष जागीच ताब्यात घेतले.
त्यात जॉनी ऊर्फ मुन्ना सुंदर काळे (३८, शांतीनगर पवारवाडी, चाळीसगाव), मिर्झा ईमरान मोहसीन बेग (४४, पवारवाडी, चाळीसगाव), अमोल दिलीप जैस्वाल (४५, पवारवाडी, चाळीसगाव), खुशाल अनिल जैस्वाल (३९, स्टेशन रोड मस्जिदजवळ चाळीसगाव), किरण सीताराम गवळी (३२, सानेगुरुजी नगर, हिरापूररोड, चाळीसगाव) यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातील रोख रक्कम, मोटर सायकल, पत्ता जुगाराचे साहित्य असा एकूण १ लाख ७२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला महाराष्ट्र जुगार का. कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.