रावेर : प्रतिनिधी
अयोध्या येथे श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त शहरातून निघालेल्या शोभयात्रेवर भोई वाड्याजवळ समाजकंटकांकडून दगडफेक केल्याची घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. पोलिसांनी रात्रभर अटकेची मोहीम राबवित २२ संशयितांना जेरबंद केले होते. चौकशीअंती १४ संशयितांना पोलिसांनी अटक करीत त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. शहरात तणावपुर्ण शांतता असून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शहरातून निघणाऱ्या शोभायात्रेवर अचानक दगडफेकीची घटना घडली. पोलिस यंत्रणा अधिक सर्तक असल्यामुळे पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ, तहसीलदार बी. ए. कापसे यांच्या सहकाऱ्यांनी काही वेळातच परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. या दगडफेकीमध्ये सहायक पोलीस निरीक्षक आशिष पाटील यांच्यासह दोन पोलीस कर्मचारी व लहान मुलगा जखमी झाला. दरम्यान, ज्या दिशेने शोभायात्रेवर दगडफेक केली जात होती पोलिसांनी त्या दिशेने धाव घेत तात्काळ संशयितांना ताब्यात घेतले.
त्यानंतर शोभायात्रा त्याठिकाणाहून पुढे काढून समारोप केला. यात पोलिसांनी खूप महत्त्वाची भूमिका निभावल्याने आज दिवसभर शहरात सर्वत्र चचर्चा होती. यावेळी पोलीस महेश मोगरे, प्रमोद पाटील, विशाल पाटील, सचिन घुगे, पोलीस निरीक्षक तुषार पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ, पोलीस निरीक्षक सचिन नवले, पुरुषोत्तम तांबे, दीपाली पाटील, गणेश धुमाळ, विठ्ठल देशमुख, ईश्वर चव्हाण, सुरेश मेढे, सोनू तडवी, तथागत सपकाळे, समाधान ठाकूर यांनी परिस्थतीवर नियंत्रण मिळविले, घटनास्थळी तात्काळ पोलीस अधीक्षकांचा जिल्ह्यातील अधिकारी व फौज फाटा तैनात करण्यात आला आहे.