वर्धा : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडल्यानंतर आरोपींना कारागृहात पाठविण्यात येत असते पण या आरोपीचा माज कारागृहात सुद्धा उघड होत आहे. नुकतेच वर्धा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कारागृह अधीक्षकांना भेटू दे म्हणत कैद्याने कर्मचाऱ्यास मारहाण केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी कैद्यावर वर्धा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वर्धा शहर पाेलिस तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनूसार वर्धा कारागृह अधीक्षकांना भेटण्याचा तगादा लावत न्यायदीन बंदीवानाने थेट कर्तव्यावर असलेल्या हवालदाराशी धक्काबुक्की केली. त्यास मारहाण करीत शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. न्यायदीन बंदीवानाचे नाव रेहमत खान हबीब खान पठाण (रा. हिंगणघाट) असे आहे. ताे जिल्हा कारागृहात बंदीस्त आहे. कारागृहातील हवालदार बॅरेक क्रमांक ७ येथे कर्तव्यावर असताना आरोपी न्यायदीन बंदीवान रेहमत पठाण याने हवालदाराला कारागृह अधीक्षकांना भेटण्याची विनंती केली होती.
हवालदाराने पहिले भत्ता घे, साहेब राऊंडवर गेलेले आहे. राऊंड झाल्यावर भेटायला पाठवतो, असे त्यास सांगितले. मात्र, न्यायदीन बंदीवान रेहमत पठाण याने आत्ताच भेटायचे आहे असा तगादा लावत हवालदाराच्या कानशिलात लागावून धक्काबुक्की करीत शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी पोलिस हवालदाराने थेट याबाबतची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दिली. पोलिस निरीक्षक धनाजी जळक यांनी कारागृहात जात पंचनामा करुन न्यायदीन बंदिवान रेहमत पठाण (रा. हिंगणघाट) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.