जळगाव : प्रतिनिधी
अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करुन त्याचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ३० हजारांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी रात्री उघडकीस आला. याप्रकरणी चौघा संशयितांविरुद्ध पोक्सो व खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती डीवायएसपी संदीप गावित यांनी गुरुवारी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाची काही महिन्यांपूर्वी स्विमिंग शिकत असताना संशयितांसोबत ओळख झाली होती. त्यानंतर दि. १७ रोजी संशयितांनी पीडित मुलाला खान्देश कॉम्प्लेक्स परिसरात नेत त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य करून त्याचा व्हिडीओ बनवला. संशयितांनी पीडित मुलाकडे ३० हजारांच्या खंडणीची मागणी केली. मुलाकडून क्यूआर कोडद्वारे दोन वेळा रक्कमही घेतली. परंतु तरीही संशयित आरोपींची मागणी वाढतच असल्याने पीडित मुलाने वडिलांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तिघांना अटक केली असून चौथा संशयित फरार असल्याचे डीवायएसपी संदीप गावित यांनी सांगितले.