पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ग्रामीण भागासह शहरात देखील मोठ्या प्रमाणात गांजा विक्री सुरु असल्याच्या अनेक घटना घडत असतांना यावर पोलीस विभागातर्फे मोठी कारवाई देखील सुरु आहे. नुकतेच पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या अंमलीपदार्थ विरोधी पथकाने एकाच दिवशी केलेल्या दोन कारवाईत 1 कोटी 31 लाख 55 हजार 300 रूपये किमतीचा जवळपास 96 किलो 87 ग्रॅम गांजा जप्त केला आहे.
या प्रकरणी कृष्णा मारुती शिंदे, अक्षय बारकू मोरे, हनुमंत भाऊसाहेब कदम, देवी प्रसाद उर्फ देवा सिताराम डुकळे या चार आरोपींना अटक करण्यात आली असून एक चार चाकी वाहन आणि दोन मोठ्या रुग्णवाहिका जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्यातून पिंपरी चिंचवड शहरात चारचाकी वाहन आणि काही रुग्णवाहिकेतून गांजाची तस्करी केली जात असल्याची गोपनीय माहिती अंमलीपदार्थ विरोधी पोलीस पथकाला मिळाली होती. त्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून या चारही आरोंपींना अटक केली. सोबतच त्यांच्या ताब्यातून एक चार चाकी वाहन आणि दोन मोठ्या रुग्णवाहिका जप्त केल्या आहेत.