जळगाव : प्रतिनिधी
मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा निलंबित पोलिस निरीक्षक किरणकुमार बकालेची दोन दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर बुधवार, १७ जानेवारीला ऑनलाइन पद्धतीने न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर दुपारी तीन वाजेच्या सुमारास बकालेची धुळे कारागृहात रवानगी करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा निलंबित पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले गुन्हा दाखल झाल्यानंतर साडे सोळा महिन्यांनी सोमवार, १५ जानेवारी रोजी पोलिसांना शरण आला होता, त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. ही कोठडी संपल्याने बकालेला बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ऑनलाइन पद्धतीने न्यायालयासमोर हजर केले. त्यावेळी त्याला मुख्य न्याय दंडाधिकारी मुगळीकर यांनी न्यायालयीन कोठडीचे आदेश दिले. त्यानंतर बकालेतर्फे जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. त्यात पोलिसांचे म्हणणे सादर करण्यास सांगण्यात आले असता जामीन नामंजूर करण्यात यावा, असे पोलिसांनी म्हणणे मांडले. यासोबतच बकाले याच्या जामिनाविषयी खुलासा सादर करण्याची मुदत मागण्यात आली असता गुरुवार, १८ जानेवारीपर्यंत ही मुदत देण्यात आल्याचे हरकतदारांचे वकील गोपाळ जळमकर यांनी सांगितले. दरम्यान, सोमवारी बकालेला अटक झाल्यानंतर न्यायालय परिसर व न्यायाधीशांच्या निवासस्थानी झालेली गर्दी पाहता पोलिसांनी बकालेला ऑनलाइन पद्धतीने न्यायालयासमोर हजर केले.