जळगाव : प्रतिनिधी
रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक दोनवर ८१ हजार ७२० रुपये किमतीचा आठ किलोपेक्षा जास्त गांजा बेवारस स्थितीत आढळून आला. रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) तो जप्त केला. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध मंगळवार, १६ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १५ जानेवारी रोजी रात्री रेल्वे सुरक्षा बलाचे सहाय्यक फौजदार विनोद साळवे, डी.एच. खैरनार हे स्थानकावर गस्त घालत असताना त्यांना फलाट क्रमांक दोनवर एक ट्रॉली बॅग, लाल व पिवळ्या रंगाची कापडी पिशवी बेवारस स्थितीत आढळून आली. आरपीएफ निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील यांनी नायब तहसीलदार दिलीप बारी, वैध मापन विभागाचे उपनियंत्रक बा. गं. जाधव, निरीक्षक चंद्रशेखर पालीवाल यांना कळवून त्यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. बॅग व पिशव्यांमध्ये गांजाचे ८१ हजार ७२० रुपये किंमतीचे आठ किलोपेक्षा जास्त वजनाचे सहा पाकीट आढळून आले. तपास पोउनि राजेंद्र पाटील करत आहेत.