जळगाव : प्रतिनिधी
मराठा समाजाविषयी अत्यंत बेताल वक्तव्य केल्यानंतर गेल्या दिड वर्षांपासून पोलिसांना चकवा देणारे जळगाव गुन्हे शाखेचे निलंबित निरीक्षक किरणकुमार बकाले हे सोमवारी पोलिसांना शरण आले. दुपारी बकाले यांना न्या.केळकर यांच्या निवासस्थानी हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, निलंबित निरीक्षक बकाले यांना जळगाव न्यायालयात आणण्यात येणार असल्याने प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मात्र कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता बकाले यांना न्यायमूर्तींच्या निवासस्थानी हजर करण्यात आले.
स्थानिक न्यायालयासह हायकोर्टाकडूनही दिलासा मिळाला नसल्याने निलंबित निरीक्षक किरणकुमार बकालेंच्या पदरी निराशा पडली होती तर दुसरीकडे पोलिस प्रशासनाने त्यांच्याविरोधात स्टॅण्डींग वॉरंट काढत मालमत्ता जप्तीसाठी न्यायालयात अर्ज केला होता. आपल्या सभोवताच्या अडचणी वाढत चाललेल्या पाहून बकाले यांनी सोमवारी पोलिसांपुढे शरणागती पत्करली.
निलंबित निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाविषयी अत्यंत अवमानजनक वक्तव्य केल्यानंतर त्याबाबतची ऑडीओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर राज्यातील मराठा समाजात आजही संतापाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी बकाले पोलिसांना शरण आल्यानंतर त्यांना सोमवारी दुपारी न्यायालयात नेण्यात येणार असल्याचे प्रचंड पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होण्यासाठी बकाले यांना न्या.केळकर यांच्या निवासस्थानी हजर करण्यात आल्यानंतर त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपासाधिकारी तथा पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत यावेळी उपस्थित होते.