जळगाव – मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी जळगाव गुन्हे शाखेचे निलंबित निरीक्षक किरणकुमार बकाले हे गेल्या दिड वर्षांपासून फरार होते. पोलिसांकडून शोध सुरू असतानाही ते सापडत नसल्याने पोलिस यंत्रणेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. मात्र आज अचानक सकाळी किरणकुमार बकाले हे स्वतःहून पोलिस अधीक्षक कार्यालयात शरण आले.
मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी विनोद देशमुख यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होता. तेव्हापासून बकाले हे फरार होते. पोलीस प्रशासनाने ही बकाले यांना निलंबित करून नाशिक येथे हजर होण्यास सांगण्यात आले होते. मात्र, हजर न होता त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला मात्र, हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यानंतर औरंगाबाद हायकोर्टात जामीन अर्ज दाखल केला होता. परंतू तेथे देखील अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात होता.
अडचणी वाढल्याने सरेंडर
या प्रकरणाचा तपास जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक यांच्याकडून काढून, तो होम डीवायएसपी संदीप गावित यांच्याकडे सोपवण्यात आला होता. त्यांनी बकाले यांच्या शोधार्थ तीन पथकांची नेमणूक केली होती मात्र दरवेळी बकाले हे चकवा देण्यात यशस्वी होत होते. मात्र पोलिस यंत्रणेने दबाव वाढवत त्यांच्याविरोधात स्टॅण्डींग वॉरंट काढत मालमत्ता जप्तीसाठी न्यायालयात अर्ज केला होता. अडचणी वाढत चाललेल्या पाहून बकाले हे आज पोलिसांपुढे हजर झाले.
पोलिस उपअधीक्षकांकडे जाब-जवाब
जळगाव पोलिस उपअधीक्षक संदीपकुमार गावीत यांच्याकडे निलंबित निरीक्षक किरणकुमार बकाले यांना हजर करण्यात आले असून त्यांच्यापुढे त्यांचा जवाबजवाब सुरू आहे.