बीड : वृत्तसंस्था
राज्यभरात मनोज जरांगे पाटलांच्या सभेनंतर आता ओबीसीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांच्या सभेचा धडाका सुरु आहे. आता बीडमध्ये आज ओबीसींची जाहीर महाएल्गार सभा होत आहे. या सभेमुळे छगन भुजबळांची तोफ बीडमध्ये धडाडणार असून सभेसाठी मंत्री धनंजय मुंडे, ओबीसी नेत्या पंकजा मुंडे, ओबीसी जयदत्त क्षीरसागर यांच्यासह अन्य ओबीसी नेत्यांना आयोजकांनी निमंत्रण देखील दिलं आहे.
बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर ही जाहीर सभा होत आहे. या सभेची तयारी आता पूर्ण झालीये. जवळपास 40 बाय 80 चे भव्य स्टेज उभारले असून 50 हजार खुर्च्या टाकून मैदान देखील तयार करण्यात आले आहे. तर याच सभास्थळाच्या मैदानाच्या परिसरामध्ये मोठमोठे होर्डिंग लावण्यात आले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांच्या पाठोपाठ आता बीडमध्ये ओबीसी नेते छगन भुजबळ यांची आज जाहीर सभा होत आहे. अवघ्या २ दिवसांवर ही सभा असताना गुरूवारी या सभेच्या व्यासपीठाचे भूमिपूजन ओबीसींच्या ३५ संघटनांनी एकत्रित येत केले आहे.
मराठा आरक्षणावरून छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात सतत दावे प्रतिदावे होतायत तसेच एकमेकांवर टीकास्त्र सोडलं जातं आहे. त्यामुळे आजच्या सभेत भुजबळ नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.