जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील पहूर येथील शेरी शिवारातून २० ते २५ शेतकऱ्यांच्या शेतातील कृषी पंप व केबल चोरीला गेल्याचे समोर आले आहे. या साहित्याची किंमत जवळपास तीन लाख रुपये आहे. याप्रकरणी पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी सोनाळा येथील २० शेतकऱ्यांकडील कृषी पंप चोरीला गेल्याची घटना घडली होती. त्यानंतर शेरी शिवारातील कृष्णा बोरसे यांच्या शेतातील कृषी पंप व युवराज सोनवणे, दिलीप गोंधनखेडे, ज्ञानेश्वर देशमुख, नाना पाटील, भागवत बनकर, देवीदास पांढरे, शांताराम पाटील, शांताराम सोनवणे, दादाराव सोनवणे यांच्यासह १५ शेतकऱ्यांच्या शेतातील कृषी पंपाच्या केबल चोरीला गेल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे जवळपास तीन ते साडेतीन लाखांचे आर्थिक नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी पहूर पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. केबल चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकरी मेटकुटीस आला आहे.