मुंबई : वृत्तसंस्था
देशभरात अनेकवेळा लहान मुलांना पळवून नेल्याच्या घटना उघडकीस येत असतांना नुकतेच मुंबईच्या कांदिवली पश्चिमेकडील महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयातून 20 दिवसांच्या नवजात बाळाची चोरी झाल्याची खळबळ जनक घटना उघडकीस आली आहे. यानंतर कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून बाळ चोरी करणाऱ्या महिलेला मालवणी परिसरातून अटक केलीये. तसेच बाळाला सुखरुप आईकडे सुपूर्द केलंय. या घटनेमुळे रुग्णालयातील सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
कांदिवली परिसरात राहणाऱ्या महिलेची 25 दिवसांपूर्वी कांदिवली पश्चिमेकडील महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयात प्रसूती झाली. तिला मुलगा झाला मात्र बाळाचे वजन कमी आणि अशक्त असल्याने त्याच्यावर रुग्णालयातच उपचार सुरू होते. याच दरम्यान मालवणी परिसरात राहणाऱ्या एका महिलेने प्रसूती झालेल्या महिलेची दिशाभूल करत तिच्या वीस दिवसाच्या बाळाची चोरी केली.
मुलाची चोरी करून ती पळून गेली. पळून जातानाची दृश्य रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालीत. मुल चोरी झाल्याप्रकरणी मुलाच्या पालकांनी कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप विश्वासराव यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय गीते यांनी तपासाला सुरुवात केली.
मुंबईच्या कांदिवली पश्चिमेकडील महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयातून 20 दिवसांच्या नवजात बाळाची चोरी… pic.twitter.com/bN5x4OGKvN
— Ruchika (@Ruchika66964659) January 12, 2024
शताब्दी रुग्णालयातून मुल चोरी करण्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे या गुन्ह्याचा तपास सीसीटीव्ही फुटेच्या आधारे पोलिसांनी सुरू केला. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ही महिला प्रथम मुलाला मालवणी परिसरात घेऊन गेली होती. महिलेकडे चौकशी केली असता, महिलेचे दीड वर्षांपूर्वी लग्न झाले होते, मात्र तिला मूल होत नव्हते, त्यामुळे ती नाराज होती आणि महिला मुलाला घेऊन पळून गेली होती. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतलं आणि बाळाला तिच्या पालकांच्या ताब्यात दिलं.