लातूर : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील वाढवणा येथील एका आरोपीने राहत्या घरी स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. घडलेल्या प्रकाराची माहिती पीडित मुलीने आईला सांगितल्यावर वाढवणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यातील आरोपीस मंगळवारी उदगीर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. डी. सुभेदार यांनी जन्मठेप व एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. ही घटना ३ मे २०१८ रोजी घडली होती. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा नोंद करून पोलिस उपनिरीक्षक पी. जी. शिरसे यांनी तपास केला. सहायक पोलिस निरीक्षक जी. के. शेख यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
सरकार पक्षाकडून ११ जणांची साक्ष सरकार पक्षाच्या वतीने ११ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. साक्षीदारांच्या साक्षीपुराव्यांवर व कागदपत्रांवर तसेच सहायक सरकारी वकील शिवकुमार गिरवलकर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश पी. डी. सुभेदार यांनी आरोपीस सश्रम जन्मठेपेची व एक लाख रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.