जळगाव : प्रतिनिधी
शहरासह ग्रामीण भागात अनेक चोरी व घरफोडीचे सत्र सुरु असतांना नुकतेच शहरातील आदर्श नगरात मैत्रिणीच्या घरी लग्न असल्याने तेथे जाताना शिक्षिका अर्चना हितेंद्र ढुमे (४९) यांचे फ्रिजरमध्ये ठेवलेले ३ लाख ४५ हजार रुपये किमतीचे दागिने चोरी झाले. रामानंदनगर पोलिसांत शिक्षिकेच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरात काम करणाऱ्या मोलकरणीसह तिच्या मैत्रिणीवर संशय असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील खासगी शाळेतील शिक्षिका अर्चना ढुमे यांच्या मैत्रिणीकडे नागपूर येथे विवाह सोहळा असल्याने त्या ३० डिसेंबर रोजी पहाटे तेथे गेल्या होत्या. घराची चावी शेजाऱ्याकडे असल्याने ती चावी घेऊन दुमे यांच्याकडे काम करणारी मोलकरीण विद्या साळुंखे काम करून निघन जात होती १ जानेवारी रोजी मध्यरात्री २ वाजता अर्चना ढुमे लग्नाहून परतल्या. सकाळी शाळा असल्याने कामावर निघून गेल्या व संध्याकाळी परतल्यावर त्यांनी आपले दागिने फ्रिजरमध्ये पाहिले असता २५ ग्रॅमचे कानातील टॉप्स ५ जोड, २५ ग्रॅमचा सोन्याचा लक्ष्मीहार, ३० ग्रॅमची सोन्याची पोत, ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी. १० ग्रॅमचे सोन्याचे तीन पेंडल २० ग्रॅमची सोन्याची पाटली असे एकूण ३ लाख ४५ हजारांचे दागिने गायब असल्याचे लक्षात आले. घरात सर्वत्र दागिने शोधले; मात्र ते सापडत नसल्याने त्यांनी रामानंदनगर पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीत मोलकरीण व तिच्या मैत्रिणीवर संशय व्यक्त करण्यात आला आहे.