जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना नियमित घडत असतांना नुकतेच पारोळ्याकडून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्या तीन जणांना वाचवण्याच्या प्रयत्नात दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात जितेंद्र भालेराव (वय ३०) वर्षे रा. धरणगाव हा जागीच ठार झाला. हा अपघात महामार्गावर अमळनेर नाक्याजवळ गुरुवारी सायंकाळी ७.४५ वाजता घडला. त्यानंतर संतप्त झालेल्या जमावाने रास्ता रोको आंदोलन केले, या आंदोलनामुळे सहा ते सात किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ४८, एटी ७६८२ हा ट्रक पारोळ्याकडून येत होता. त्याची धडक एमएच १९ बीके ०४४२ क्रमांकाच्या दुचाकीला बसली. त्यात दुचाकी चालक जितेंद्र भालेराव हा जागीच ठार झाला. धनंजय साठे (वय ४०), शाहरुख पठाण (२८) बाळू पवार (२४) आणि कैलास पवार (२५) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघातानंतर येथे गतीरोधक तयार करावे, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. काही नागरिकांनी जेसीबी बोलावून तेथे गतिरोधकासाठी चरी खोदण्यास सुरुवात केली. हे काम रात्री १० नंतरही सुरू होते. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जखमींना उपचारासाठी नेण्याकरता काँग्रेसचे राज्य प्रतिनिधी विजय महाजन व परिसरातील नागरिकांनी मदत केली. तसेच आंदोलन वेळी अमित पाटील, प्रा. मनोज पाटील, एस. आर. पाटील यांनी सहकार्य केले. दोन दिवसांपूर्वी शाळकरी मुलगा महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली असून तो गंभीर जखमी झाला असून उपचार घेत आहे.