जळगाव : प्रतिनिधी
शहरापासून नजीक असलेल्या एमआयडीसी परिसरातील व्ही सेंक्टरमधील सानप पॉलीमर कंपनीसमोर केमीकल पावडर भरलेल्या आयशर ट्रकच्या कॅबीनमध्ये अचानक आग लागल्याची घटना बुधवारी १० जानेवारी रोजी दुपारी दीड वाजता घडली आहे. महापालिकेच्या अग्नीशमन विभागाच्या बंबाच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात आली आहे. ही आग नेमकी कश्यामुळे लागली याची माहिती समोर आलेली नाही, परंतू ट्रकच्या कॅबिनमधील सामान जळून मोठे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव औद्योगीक वसाहत मधील व्ही सेक्टरमधील सानप पॉलीमर इंडस्ट्रीजसमोर आयशर ट्रक क्रमांक (केए ५१ सी ५४९९) हा पार्कींगला लावलेला होता. बुधवारी १० जानेवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ट्रक चालक कुमार परमसेवम रा. सेलम, तामिलनाडू हा ट्रकच्या बाहेर उभा होता. त्यावेळी अचानक ट्रकच्या कॅबिनमध्ये अचानक आग लागली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर ट्रक चालक कुमार परमसेवम याने तातडीने आग विझविण्यासाठी धावपळ केली. तसेच परिसरातील कंपनीतील कामगारांनी देखील आग विझविण्यासाठी धाव घेतली. शिवाय महापालिकेचा अग्निशमन बंब बोलाविण्यात आला. काही वेळातच बंब घटनास्थळी दाखल झाला. फायरमन रोहिदास चौधरी, भगवान पाटील, योगेश पाटील आणि वाहनचालक देविदास सुरवाडे यांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळविले. दरम्यान, ट्रकमध्ये केमीकल पावडर असल्याचे ट्रकचालक याने सांगितले. या घटनेबाबत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.