बांधकाम मटेरीयलची वाहतूक करणाऱ्या व्यावसायीकाचा डंपर अडवून 30 हजारांची लाच मागून ती खाजगी पंटराच्या माध्यमातनू स्वीकारताना अमळनेर पोलिस ठाण्यातील हवालदारासह खाजगी पंटराला धुळे एसीबीने रंगेहाथ अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. हवालदार घनश्याम अशोक पवार व खाजगी पंटर इम्रानखान शब्बीरखान पठाण असे अटकेतील लाचखोरांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 30 हजारांची लाच भोवली तक्रारदार हे अमळनेर शहरातील रहिवासी असून त्यांचा बांधकाम मटेरीयलचा व्यवसाय आहे. अमळनेरचे हवालदार घनश्याम पवार यांनी 7 जानेवारी तक्रारदार यांचा डंपर अडवत त्यांच्याकडे पोलिस निरीक्षक विजय शिंदे व स्वतःसाठी दरमहा हप्ता म्हणून 30 हजारांची लाच मागितली व त्याबाबतची तक्रार तक्रारदाराने धुळे एसीबीकडे दूरध्वनीवरून केली. धुळे एसीबीने 9 रोजी लाचेबाबत पडताळणी केल्यानंतर हवालदार पवार यांनी 30 हजारांची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सापळा रचण्यात आला. खाजगी पंटर इम्रान खान याच्याकडे लाचेची रक्कम देण्याचे घनश्याम पवार सांगितल्यानंतर सुरूवातीला खाजगी पंटर व नंतर घनश्याम पवार यांना एसीबीने अटक केली.
ही कारवाई धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलिस निरीक्षक रुपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, रामदास बारेला, संतोष पावरा, प्रवीण मोरे, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांच्या पथकाने केली आहे.