छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
मुंबई- जालना ताशी १०० कि.मी.च्या वेगाने धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसमधील एका बोगीत अचानक सायरन वाजू लागतो आणि काही अंतरावर जाऊन ही रेल्वे उभी राहते. आगीच्या भीतीने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडते; परंतु हा सगळा प्रकार सिगारेटच्या धुरामुळे झाल्याचे स्पष्ट होते आणि प्रवासी सुटकेचा नि:श्वास सोडतात.
नाशिक रेल्वे स्टेशन काही अंतरावर असताना मंगळवारी दुपारी ४:३० च्या सुमारास ही घटना घडली. मुंबईहून रवाना झाल्यानंतर वंदे भारत एक्स्प्रेस नाशिक रेल्वे स्टेशनवर पोहोचणार होती. तोच सी-५ या बोगीतील सायरन जोरजोराने वाजू लागला. तिकीट निरीक्षक, रेल्वे कर्मचाऱ्यांनी बोगीत येऊन विचारपूस केली. काहीही माहिती मिळत नसल्याने सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. तेव्हा एका प्रवाशाने बाथरूममध्ये सिगारेट ओढल्याचे दिसले. या प्रवाशाला नाशिक रेल्वे स्टेशनवर रेल्वे सुरक्षा बलाने ताब्यात घेतले.