बीड : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ग्रामीण भागात व शहरात स्त्री भ्रूणहत्येच्या घटना नेहमीच घडत असतांना नुकतेच बीडच्या परळीमध्ये पुन्हा एकदा मुलीला फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ८ महिन्यांच्या मुलीला अनोळखीने पोत्यात गुंडाळून परळीपासून 6 किलोमीटर अंतरावर मालेवाडी रोडवर फेकून दिलं. परिसरातील एका व्यक्तीने याविषयी पोलिसांना फोनवरून माहिती दिली. त्यानंतर परळी ग्रामीण पोलिसांच्या सतर्कतेमुळे या 8 महिन्याच्या चिमुकलीचे प्राण वाचले आहेत. सध्या या चिमुकल्या मुलीवर परळी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 9 वाजण्याच्या सुमारास परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाने फोन करून माहिती दिली की, मालेवाडी रोड लगत एका मुलीला पोत्यात गुंडाळून फेकलं आहे. मात्र हे क्रूर कृत्य कुणी केलं हे मला माहित नाही. सदर घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याच्या टीमसह सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण गीते घटनास्थळी दाखल झाले.
पाहतात तर काय ? एक साधारण 8 महिन्यांची मुलगी तिचं अर्धशरीर पोत्यात आणि पाय बाहेर अशा स्थितीत आढळून आली. संबंधित पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता सदर चिमुकल्या मुलीस परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणून उपचारार्थ दाखल केले. डॉक्टरांनी मुलीवर ताबडतोब उपचार सुरू केले. पोटात अन्न पाणी नसल्याकारणाने चिमुकली फारच अशक्त झाली होती. मात्र उपचारानंतर तिची तब्येत चांगली होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. याप्रकरणी अद्याप परळी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे. ही चिमुकली नेमकी कुणी फेकली? निदर्यी मातेनी फेकली की अन्य काही प्रकार आहे ? याचा देखील तपास सुरू आहे. दरम्यान यामुळं परळीसह बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे.