मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शिवसेनेच्या शिवसेनेच्या ठाकरे की शिंदे, कुणाचे आमदार अपात्र होणार? यावर उद्या म्हणजेच बुधवारी (१० जानेवारी) जाहीर होणार आहे. याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. अशातच अपात्रतेच्या निकालाआधीच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक गंभीर आरोप केला आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणखी वेळकाढूपणा करतील, उद्या रात्री ११:५९ पर्यंत वेळ खेचतील मग निकाल जाहीर करतील, असं ठाकरे यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकारपरिषद घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. न्यायमूर्तीच आरोपीला भेटत असतील तर आम्ही न्यायाची अपेक्षा कुणाकडून करायची, असा खोचक सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
न्यायाधीश आणि आरोपीची मिलिभगत आहे का? असं म्हणत ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटीवर देखील निशाणा साधला आहे. त्याचबरोबर आम्ही दोघांच्या भेटीवर आक्षेप घेतला असून सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे, अशी माहितीही ठाकरे यांनी पत्रकारपरिषदेतून दिली. वेडावाकडा निर्णय लागल्यास जनतेला माहिती असायला हवी, आम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडून अपेक्षा आहेत. असा विश्वास देखील ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयाला विनंती करतो, की तुमच्या डोळ्यादेखत हे घडत आहे. याची गंभीर दखल घेणे गरजेचं असल्याचं ठाकरे यांनी म्हटलं आहे.