जळगाव : प्रतिनिधी
शहरात भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या १३ वर्षीय अल्पवयीन मतीमंद मुलीला शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडीस आली आहे. याप्रकरणी वसीम खान कय्युब खान (वय २५) या संशयिताला पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सुभाष चौकातील मंदिराजवळ १३ वर्षीय गतिमंद अल्पवयीन मुलगी तिच्या नातेवाईकांसोबत भिक मागत होती. त्यावेळी संशयित वसीम खान कय्युब खान हा मुलील (एमएच १९ ईएच ५४३१) दुचाकीवरुन जळगाव ते भुसावळ मार्गावरील दूरदर्शन टॉवरजवळील एका शेतात घेऊन गेला आणि त्याठिकाणी वसीम खान याने मुलीवर अत्याचार केला. हा प्रकार पीडीत मुलीने नातेवाईकांना सांगितला. त्या वेळी त्यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. ही मुलगी गायब झाल्याने सुरुवातीला या मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल होता.
पोलिसांच्या तपासात तरुणीवर अत्याचार झाल्याचे उघड झाल्यानंतर या गुन्ह्यात अत्याचार, पोस्को कायद्यान्वये कलम वाढविण्यात येऊन वसीम खान अय्युब खान याच्याविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली व खान याला रविवारी अटक करण्यात आली. संशयिताला अटक केल्यानंतर रविवारी त्याला न्यायाधीश जे. जे. मोहीते यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने संशयिताला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे सहाय्यक जिल्हा सरकारी वकील आर.टी. सोनवणे यांनी बाजू मांडली.