भुसावळ : प्रतिनिधी
क्रेडिट कार्डचे लागलेले चार्जेस परत करण्याचे आमिष दाखवत भुसावळ रेल्वे विभागातील २९ वर्षीय तरुणाला ऑनलाइन तब्बल ६५ हजार ५०९ रुपयांचा गंडा घालण्यात आला. हा प्रकार रविवार, दि. ३१ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी शुक्रवारी दुपारी भुसावळ शहर पोलिसांत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गजानन महाराजनगर परिसरातील सलमान खान कायमखानी (वय २९) हा रेल्वे विभागात नोकरीला असून त्याला रविवारी दुपारी १२ वाजता अनोळखी दोन मोबाइल क्रमांकांवरून फोन आला. बँकेतील कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह बोलत असल्याची बतावणी केली. तसेच क्रेडिट कार्डसाठीचे चार्जेस ९ हजार ९९९ रुपये परत करायचे आहे, असे सांगून एक लिंक पाठवली आणि त्यावरून दोन ट्रान्झेक्शन करून ६५ हजार ५०९ रुपये बँक खात्यातून वळते करून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी बँकेत चौकशी केली; परंतु त्याबाबत त्यांना काहीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी शुक्रवारी दुपारी तीन वाजता भुसावळ शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. अज्ञात दोन अज्ञातांविरोधात भुसावळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक गजानन पडघम करीत आहेत