जळगाव : प्रतिनिधी
शहरातून डोळ्यांची शस्त्रक्रिया करून मुलासोबत दुचाकीने घरी जात असताना ट्रकने दुचाकीला धडक दिली व त्यात युसूफ शेख इस्माईल खाटीक (७८, रा. खाटीक गल्ली पारोळा) हे खाली पडून ट्रकखाली चिरडून ठार झाले. या अपघातात अस्लम शेख युसूफ खाटीक (४४) हे जखमी झाले आहे. हा अपघात शुक्रवार, ५ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास गुजराल पेट्रोल पंपासमोरील उड्डाणपुलावर झाला. पोलिसांनी ट्रकसह चालकाला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा येथील युसूफ शेख इस्माईल खाटीक यांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया असल्याने ते गेल्या चार दिवसांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल होते. शुक्रवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते मुलगा अस्लम शेख युसूफ खाटीक यांच्यासोबत दुचाकीने (एमएच १९, ईएफ ७५२४) पारोळा येथे घरी जाण्यासाठी निघाले होते. या वेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. यामध्ये युसूफ शेख यांचा तोल जाऊन ते खाली पडले व ट्रकने त्यांना चिरडल्याने ते जागीच ठार झाले, तर त्यांचा मुलगा अस्लम खाटीक हे गंभीर जखमी झाले. या वेळी वडिलांचा मृतदेह पाहून अस्लम शेख हे निःशब्द झाले होते. काही वाहनधारकांनी त्यांना धीर दिला. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रकसह चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.