बोदवड : प्रतिनिधी
शहरातील साखला कॉलनीत राहणाऱ्या घरमालकाला भरदुपारी घराबाहेर देवीचे पूजन ताट घेऊन आलेल्या महिलेने गुंगारा देत पाच लाखांचा चुना लावला. ही घटना शनिवारी घडली. याबाबत पोलिसात नोंद करण्यात आलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील साखला कॉलनीमध्ये राहणाऱ्या सुरेखा कैलास शर्मा (४५) या पती कैलास शर्मा यांच्यासोबत दि. ३० डिसेंबर रोजी बसलेल्या होत्या. यावेळी त्याच्या घराजवळ एक महिला आली. तिच्या हातात कुंकूवाचा ताट होता. महिलेला दक्षिणा मागितली. देवाला कुंकू लावण्याचे सांगत घरात प्रवेश केला. त्यानंतर स्वच्छतागृहात गेली. तेथून आल्यावर हातात असलेला रूमाल झटकताच सुरेखा शर्मा व त्यांचे पती कैलास शर्मा बेशुद्ध झाले. त्यानंतर या महिलेने घरातील दागिने, सव्वातीन लाखांची रोकड ऐवज घेऊन पोबारा केला. काही वेळाने दोन्ही पती-पत्नी शुद्धीवर आले, असता त्यांना काहीच कळले नाही. परंतु काही वेळाने त्यांना पैशांचे काम पडल्याने त्यांनी शोधाशोध केली असता कपाटात असलेली रोकड, दागिने असा एकूण पाच ते सव्वापाच लाखांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी बोदवड पोलिसात धाव घेतली.
बोदवड पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी गुरुवारी गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे. संशयित महिलेला लोकेशननुसार मुक्ताईनगर येथून ताब्यात ही घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ही महिला काही मेंढपाळ लोकांसोबत असल्याची शक्यता असून त्यादृष्टीने तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.