जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून अपघाताच्या घटना घडत असतांना नववर्षाच्या सुरुवातील जळगाव जिल्ह्यात एक भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. एका भरधाव कारने रस्त्याने जाणाऱ्या चार जणांना मागून जोरदार धडक दिली. यात शाळकरी मुलीसह दोन जण ठार झाले. तर अन्य दोघे गंभीर आहेत. ही घटना गोराडखेडा (ता. पाचोरा) येथे गुरुवारी सायंकाळी ५:३० वाजता घडली. याबाबत पाचही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दुर्वा भागवत पवार (१५) आणि सुभाष रामभाऊ पाटील (६२ रा. पुणे) अशी मृतांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोऱ्याहून जळगावकडे एका भरधाव कारमधून पाच जण प्रवास करीत होते. गोराडखेडा गावानजीक पायी जात असलेले सुभाष पाटील, दुचाकीस्वार परशुराम पाटील तसेच १० वीच्या विद्यार्थिनी दुर्वा पवार व ऋतुजा भोईटे (१५) या विद्यार्थिनी शाळेतून गोराडखेडे येथे घराकडे सायकलीने जात होत्या. त्याचवेळी या चारही जणांना कारने मागून जोरदार धडक दिली. त्यात सुभाष पाटील हे जागीच ठार तर दुर्वा पवार या विद्यार्थिनीचा खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला. जखमी परशुराम पाटील यांना जळगाव येथे तर ऋतुजा भोईटे हिच्यावर पाचोरा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हा अपघात झाल्यानंतर काही वेळातच पाचोरा पोलिसांचे वाहन याच मार्गाने जात होते. अपघात पाहताच पोलिसांनी कारमधील पाचही जणांना पाचोरा पोलिस ठाण्यात आणले. पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली. मयत दुर्गा भागवत पवार व सुभाष रामभाऊ पाटील यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे. संतप्त ग्रामस्थांनी सायंकाळी ही अपघातग्रस्त कार जाळून टाकली.
गोराडखेडा जवळील अपघातप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यात कार (एमएच १४ सीसी ९२७६) चालक मुजाहिद शेख बशीर (वय २३), विवेक किशोर मराठे (२४), रौनक रवींद्र गुप्ता (२५), दुर्गेश योगेश पाथरवट (२०, सर्व रा. बळीराम पेठ, जळगाव) आणि राजेश सदाशिव बांदल (३२, रा. शिवाजीनगर जळगाव) यांचा समावेश आहे. हे सर्वजण मद्य प्राशन केलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.