लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत जळगाव व भुसावळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून यासाठी जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
जळगाव उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवार दिनांक १७ डिसेंबर रोजी जिल्हा दौर्यावर येणार आहेत. जळगाव आणि भुसावळ येथे आयोजीत करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. जिल्हा दूध संघाच्या नवीन प्रकल्पाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. १७ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता अजिंठा विश्रामगृहावर भेटी आणि बैठक, त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर भुसावळ येथे आयोजीत कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
तर भुसावळ येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासह अन्य विकासकामांचे लोकार्पण अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या मेळाव्यालाही ते मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमात अनेक मान्यवरांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे देखील शुक्रवार दिनांक १७ रोजी जिल्हा दौर्यावर येत असून ते चोपडा येथील कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. अजितदादा पवार यांच्या दौर्यासाठी जय्यत तयारी सुरू करण्यात आलेली आहे. जिल्हा दूध संघातील कार्यक्रमासह भुसावळ येथील कार्यक्रमाचे नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे. उपमुख्यमंत्र्यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कामाला लागल्याचे दिसून येत आहे.