नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून देशातील अनेक राज्यात थंडीची लाट पाहायला मिळत असून पुढील काही दिवसात हवामानात बदल होताना पाहायला मिळणार आहे. देशासह राज्यातही काही भागात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील 24 तासांत महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.
पुढील 48 तासांत राज्यातील काही भागात हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे वाहत आहे. यामुळे देशासह राज्यात काही ठिकाणी पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात पुढील दोन ते तीन दिवस राज्यात काही भागात पावसाची शक्यता आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासह विदर्भ आणि मराठवाड्याच्या हवामानावरही परिणाम होणार आहे. पुढील काही दिवसात मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज आहे, असं आयएमडीने म्हटलं आहे.
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील काही दिवस देशात विविध राज्यांमध्ये दाट धुक्याची चादर पाहायला मिळणार आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये 5 जानेवारीपर्यंत धुक्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. दृष्यमानता कमी झाल्यामुळे वाहतूक सेवाही विस्कळीत झाली आहे. रेल्वे आणि विमान उड्डाणावरही परिणाम झाला आहे.