जळगाव : प्रतिनिधी
शहरात गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने कोयता व चॉपर घेऊन दुचाकीवरून जाणाऱ्या तीन जणांवर शनिपेठ पोलिसांनी कारवाई करीत घातक हत्यारे जप्त केली. ही कारवाई ३१ डिसेंबर रोजी रात्री शनिपेठ पोलिस चौकीसमोर करण्यात आली. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने तीन जण शनिपेठ पोलिस चौकी परिसरात घातक हत्यारे घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यावेळी शनिपेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असता दुचाकीवरून जाणारे विशाल अशोक पाटील (२८, रा. चौगुले प्लॉट), निर्मल नंदू अहिरे (२३, रा. मेस्कोमाता नगर), सतीश शालिक सैंदाणे (२९, रा. वाल्मीकनगर) यांच्याकडे धारदार कोयता आणि चॉपर ही हत्यारे आढळून आला. ही हत्यारे पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणी पो.कॉ. राहुल पाटील यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पो.हे.कॉ. परिष जाधव करीत आहेत