पाचोरा : प्रतिनिधी
तालुक्यातील लोहारा परिसरात दूधवाहक वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना कळमसरा गावानजीक मंगळवारी सकाळी घडली. घटनेनंतर नातेवाइकांनी एकच आक्रोश करत चालकाला आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली. त्यामुळे दोन तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, येथील गुणवंत दत्तात्रय क्षीरसागर हे शेंदुर्णी येथील राणी लक्ष्मीबाई पतसंस्थेत नोकरीला आहेत. ते दुचाकीने (एमएच १९ डीएन ७६६२) शेंदुर्णीत जात असताना कळमसरा गावाच्या पुढे एक किलोमीटर अंतरावर शेंदुर्णीकडून येणाऱ्या पिकअपने (एमएच १९ सीवाय ५७३१) त्यांना जोरदार धडक दिली. यात गुणवंत यांच्या मेंदूला जोरदार मार लागल्याने ते जागीच ठार झाले. ही घटना मंगळवारी सकाळी १० ते १०:१५ वाजेच्या दरम्यान घडली. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.
अपघातानंतर चालकाच्या विरोधात तिथेच राहिल्याने त्याच्याविरोधात नातेवाइकांच्या संतप्त भावना होत्या. पोलिस प्रशासन अपघातस्थळी १ ते १:३० तास उशिराने पोहोचले, यामुळे नातेवाइकांच्या संतापात अधिकच भर पडली. मृतदेह शवविच्छेदनासाठी नेत असताना नातेवाइकांनी दोषी चालकाला ताब्यात देण्याची किंवा त्याचे जबाब आमच्यासमोर घ्यावे, अशी मागणी केली. हा प्रकार दोन तास सुरू होता. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. वाहनचालक भूषण राजू चौधरी (गाडगेबाबा नगर, पाचोरा) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. घटनास्थळी सपोनि अमोल पवार, हेडकॉन्स्टेबल अरविंद मोरे, पोलिसपाटील सुरेंद्र शेळके यांनी शांतता राखण्यासाठी प्रयत्न केले. मयताच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील, भाऊ, काका, काकू असा परिवार आहे.