जळगाव : प्रतिनिधी
रस्त्याने जात असताना काहीही कारण नसताना सोमनाथ निंबा वंजारी (२९, रा. रामेश्वर कॉलनी) यांना मारहाण करीत त्यांच्यावर चाकूने वार करण्यात आल्याची घटना ३१ डिसेंबर रोजी संध्याकाळी घडली. या प्रकरणी दादू ऊर्फ दीक्षांत देवीदास सपकाळे व त्याच्यासोबत असलेल्या एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर सपकाळे याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, ३१ रोजी संध्याकाळी मजुरी काम करणारे सोमनाथ वंजारी हे सिद्धार्थनगर रस्त्यावरून जात असताना तेथे उभ्या असलेल्या दीक्षांत सपकाळे याने माझ्याकडे काय पाहतो, असे म्हणत मारहाण केली. त्यावेळी सोमनाथ हे तेथून निघून गेले. त्यानंतर मेहरुण तलावाकडून परत येत असताना दीक्षांत व त्याच्या सोबत असलेल्या एकाने थांबवून पुन्हा मारहाण केली व पोटाजवळ चाकूने वार केले. आमच्या नादी लागू नको, असे म्हणत ते तेथून निघून गेले. या विषयी जखमीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. हल्लेखोर मेहरुण तलाव परिसरातच असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलिस हेडकॉन्स्टेबल संजय धनगर, किशोर पाटील, सुधीर साळवे, ललित नारखेडे, किरण पाटील, साईनाथ मुंडे, छगन तायडे यांनी रात्रीच त्याला अटक केली. सोमवारी (दि. १) त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली.