जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील पहूर पेठ येथे रविवारी संध्याकाळी आठवडी बाजारात क्षुल्लक कारणावरून दोन विक्रेत्यांमध्ये शाब्दिक चकमक होऊन त्याचे मारहाणीत रूपांतर झाल्याची घटना घडली. यावेळी बाजारात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. यादरम्यान, पोलिस घटनास्थळी दाखल होताच जमावाला पांगविण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला. परिस्थितीवर नियंत्रण मिळविले असून, तणावपूर्ण शांतता आहे. यात दोन्ही बाजूंकडील सहा जण जखमी आहेत. यात एका महिलेचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहूर येथे रविवारी आठवडी बाजार भरतो. गफार खाँ पठाण व श्याम भोई यांचे दुकान शेजारी लागतात. सायंकाळी क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. याचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाल्याचे पोलिसांनी सांगितले. यादरम्यान बाजारात गोंधळ उडाला. पळापळ सुरू झाल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी पोलिस निरीक्षक सचिन सानप, पोलिस उपनिरीक्षक एस. पी. बनसोड, पोलिस कर्मचारी अनिल राठोड, गोपाळ माळी, ज्ञानेश्वर ढाकणे, विनोद पाटील, राहुल कुमावत दाखल होऊन जमावाला पांगविण्यासाठी लाठीचार्ज केला. यामुळे क्षणार्धात बाजारात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली.
यात शोभाबाई अशोक भोई, गंभीर जखमी, संजय सुपडू भोई, सुपडू अशोक भोई, गफार खाँ पठाण, शेख इम्रान शेख अब्दुल व शाहरूख पठाण जखमी असून, शोभाबाई भोई, सुपडू भोई व संजय भोई यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.