मुंबई : वृत्तसंस्था
देशात गेल्या काही दिवसापासून थंडीचा कहर वाढल्यानंतर आता गेल्या २ दिवसांपासून राज्यातील तापमानात वाढ झाली असून राज्यातील अनेक भागात तापमानाचा पारा 10 अंशांच्या पुढे गेला आहे. मात्र सरत्या वर्षाला निरोप देताना थर्टी फर्स्टला राज्यात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. देशासह राज्यातील काही भागात तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
दरम्यान, येत्या काही दिवसात राज्यातील हवामानात चढ-उतार पाहायला मिळणार आहे. राज्यातील तापमानात घट होण्याची शक्यता असून काही भागात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राज्यात पावसाची शक्यता आहे. 30 डिसेंबरपासून 2 जानेवारी दरम्यान राज्यात काही ठिकाणी तुरळक पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे नववर्षाच्या स्वागताला पावसाची हजेरी लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्याच्या किमान तापमानात वाढ झाल्याने पारा पुन्हा 10 अंशांच्या वर गेला आहे. शुक्रवारी धुळ्यात राज्यातील नीचांकी 11 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर उर्वरित राज्यात तापमानाचा पारा 13 अंशांच्या वरच आहे. त्यामुळे थंडीचा जोर ओसरला आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्र चांगलाच गारठला होता. अनेक जिल्ह्यांत तापमानाचा पारा 10 अंशांच्या खाली गेला होता होता. मात्र आता या थंडीपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.