जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एमआयडीसी परिसरात प्लॉट खाली करण्याच्या कारणावरून काशिनाथ चौकात तरूणावर चाकूहल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काशिनाथ चौकाजवळ असलेल्या मोकळ्या प्लॉटवर बांबू विक्री करण्यासाठी जागा विनोद राजाराम बाविस्कर (वय-३९, रा. बांभोरी ता.जि.जळगाव) या तरुणाला दिली होती. दरम्यान प्लॉट धारक शंभू भोसले याने प्लॉट खाली कर असे विनोद बाविस्कर याला सांगितले होते. त्यावर विनोद बाविस्कर यांनी प्लॉट खाली करण्यास नकार दिल्याने या रागातून संशयित आरोपी शंभू भोसले, विशाल वाघ, महेश चिंचोलकर, विजय अहिरे उर्फ भोपाली आणि कार्तिक भोसले उर्फ सोनू सर्व राहणार जळगाव या ५ जणांनी मंगळवार २६ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता विनोद बाविस्कर याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यातील विशाल वाघ यांनी त्याच्या कमरेतील चाकू काढून विनोद बाविस्कर या तरुणावर वार केला. परंतु तो वार त्याचा मित्र सचिन पाटील याने हातावर घेतला. त्यामुळे तो जखमी झाला. ही घटना घडल्यानंतर मारेकरी पसार झाले.
जखमीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अखेर गुरुवारी २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता विनोद बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी शंभू भोसले, विशाल वाघ, महेश चिंचोलकर, विजय अहिरे आणि कार्तिक भोसले अशा ५ जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी हे करीत आहे.