नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या काही वर्षापासून देशातील अनेक अल्पवयीन मुलांसह वयोवृद्धापर्यत अनेकदा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्देवी निधन झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहे. नुकतेच मध्यप्रदेशात एका पेंटरचा रंगाकाम करत असताना हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू झाला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. व्हिडिओत एका माणसाला अचानक हृदयविकाराचा झटका येतो आणि तो जमिनीवर कोसळतो.
मिळालेल्या माहितीनुसार, २६ डिसेंबर रोजी ही घटना घडली. आशिष असे मृत व्यक्तीचे नाव आहे. एका रिपोर्टनुसार, इंदूरमधील एका साइटवर आशिष घराचे रंगकाम करत होता. अचानक आशिषला अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे तो थोडा वेळ एका ठिकाणी बसला. काही वेळानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो जमिनीवर कोसळला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओत एका घरात रंगकाम सुरू असताना दिसत आहे. तिथे दोन – तीन पेंटर काम करत आहे. आशिषदेखील तिथेच काम करत होता. त्याला थोडे अस्वस्थ वाटू लागल्याने तो थोडा वेळ एके ठिकाणी बसला. त्यानंतर अचानक तो जमिनीवर कोसळला. त्याचे हात- पाय थरथरु लागले. यानंतर त्याला मदत करण्यासाठी त्याचे इतर सहकारी धावून आले. त्यांनी आरडोओरडा केला. आशिषला मदत करण्याचा प्रयत्न केला. परंतु दुर्दैवाने आशिषचा मृत्यू झाला. याआधीही हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.