पाचोरा : प्रतिनिधी
तालुक्यातील नगरदेवळा येथून जवळच असलेल्या बदरखे येथे सालाबादप्रमाणे पेमबुवा महाराजांची यात्रेनिमित्त तमाशाचा कार्यक्रम सुरु असतांना तमाशा बघण्यासाठी आलेल्या हनुमंतखेडा ता. सोयगाव. जि. संभाजीनगर येथील मनोज ज्ञानेश्वर निकम (२६) या युवकाचा मृतदेह २४ डिसेंबर रविवार रोजी तमाशा सुरू असलेल्या ठिकाणाहून काही अंतरावर २५ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
तरुणाच्या मृत्यूची प्राथमिक माहिती मृताचे काका नंदकिशोर पाटील यांनी नगरदेवळा औट पोस्टला दिली असता तात्काळ पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे, सहाय्यक फौजदार कैलास पाटील, मनोहर पाटील, अमोल पाटील, दिनेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन सदरील जागेचा पंचनामा करून मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला होता. मनोज निकम याच्या शरीरावर काही ठिकाणी मार लागल्याचे आढळून आल्यामुळे सदरील मृतदेह पुढील चौकशीकामी जळगाव शासकीय रुग्णालय येथे पाठविण्यात आला होता. परंतु मनोज निकम याचा मृत्यू नेमका कश्यामुळे झाला हे अजून स्पष्ट झाले नाही. परंतु या तरुणाच्या मृत्यू मुळे परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.
दरम्यान मनोज निकम याचा अकस्मात मृत्यू झाला नसून त्याचा खुन करण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी करत मारेकऱ्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर ठाम होते. अखेर २६ डिसेंबर रोजी नंदकिशोर पाटील यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात मारेकऱ्या विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राहुल खताळ हे करीत आहे.