बारामती : प्रतिनिधी
येथील विद्या प्रतिष्ठानच्या अभियांत्रिकी विभागातील रोबोटिक लॅबच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना शरद पवार यांनी गौतम अदांनींचे आभार मानले आहेत. या कार्यक्रमाला फिनोलेक्स जे पॉवर सिस्टम्स लिमिटेडचे अध्यक्ष दीपक छाब्रिया देखील उपस्थित होते. विद्या प्रतिष्ठान संस्थेने नवीन प्रकल्प हाती घेतला आहे. तंत्रज्ञानामुळे अभियांत्रिकी क्षेत्र झपाट्याने बदलत आहे. तसेच पुढे जाण्यासाठी हे बदल स्वीकारण्यास तयार असणारा गट तयार करणे अत्यंत आवश्यक आहे, असे शरद पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्योगपती गौतम अदानी यांचे पुन्हा एकदा तोंडभरुन कौतुक केले आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती येथे नवीन तंत्रज्ञान केंद्राच्या उभारणीसाठी आर्थिक मदत केल्याबद्दल शरद पवार यांनी शनिवारी उद्योगपती गौतम अदानी यांचे आभार मानले आणि त्यांचे कौतुकही केले. धारावी पुनर्विकास प्रकल्पावरुन एकीकडे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील इतर पक्षांचे अदानींविरोधात मत काही वेगळंच असल्याचे दिसत आहे.
“आम्ही भारतातील आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे पहिले केंद्र उभारत आहोत आणि त्याचे बांधकाम सुरू आहे. या प्रकल्पासाठी 25 कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यासाठी निधीची व्यवस्था करण्यात आली आहे. माझ्या आवाहनानंतर आमच्या सहकाऱ्यांनी मदत केली. या आणि त्यांनी लगेचच आपला पाठिंबा दिला. देशातील बांधकाम क्षेत्रातील सर्वात महत्वाची कंपनी असलेल्या फर्स्ट सिफोटेकने या प्रकल्पाला 10 कोटी रुपयांची मदत करण्याचे ठरवले आहे, मी त्यांचे खूप आभार मानू इच्छितो. गौतम अदानी यांचे नाव घ्यावे लागेल. त्यांनी संस्थेला 25 कोटी रुपयांचा धनादेश पाठवला असून, या दोघांच्या मदतीने आज या ठिकाणी हे दोन्ही प्रकल्प उभारत आहोत आणि कामही सुरू झाले आहे,” असेही शरद पवार म्हणाले.